शिक्षक समितीने केली 'असर' अहवालाची होळी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 31, 2025 18:24 PM
views 125  views

सिंधुदुर्गनगरी :  वस्तुस्थितीचा विपर्यास करून सरकारी शाळांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या असर अहवालाची होळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आली. 'असर' सर्वेक्षणाच्या अहवालावर शिक्षण क्षेत्रातून वेळोवेळी टीका होते. या सर्वेक्षणाच्या अहवालातून राज्यातील शैक्षणिक दुर्दशा आणि गुणवत्तेमध्ये सुधारणा नसल्याचे चित्र रंगविण्यात येते.

'असर' मध्ये वार्षिक स्थिती शिक्षण अहवाल मांडण्यात येतो. हे  सर्वेक्षण ग्रामीण भारतातील मुलांच्या शालेय शिक्षण आणि शिकण्याच्या पातळीचा अंदाज देते. २००५ पासून हा सर्वेक्षण अहवाल वर्षनिहाय प्रसिद्ध होत होता. २०१४ पासून हा सर्वेक्षण अहवाल द्विवार्षिक पद्धतीने प्रसिद्ध होऊ लागला. या सर्वेक्षणातून शैक्षणिक प्रवाह, विद्यार्थ्यांचा शाखा निवडीसाठीचा कल याचीही पाहणी केली जाते,मात्र आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार असे सर्वेक्षण शिक्षण शास्त्रातील जाणकारांनी करणे अपेक्षित असताना, प्रथम संस्था बचत गटाच्या महिला व दहावी नापास विद्यार्थी यांचे मार्फत हे सर्वेक्षण करीत असल्याने यावर आक्षेप घेतला जात आहे. यावर्षी प्रसिद्ध झालेल्या अहवालात सुद्धा चुकीचे मुद्दे मांडण्यात आल्याने त्याला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी शिक्षक समितीने जिल्हास्तरावर या अहवालाची होळी केली. 

यावेळी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, जिल्हा नेत्या सुरेखा कदम, राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर, ज्येष्ठ नेते नंदकुमार राणे, सुनील चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, पतपेढी संचालक संतोष मोरे, नारायण नाईक, चंद्रसेन पाताडे, सचिन बेर्डे, कुडाळ अध्यक्ष शशांक आटक, सचिव महेश गावडे, कणकवली अध्यक्ष टोनी म्हापसेकर, दोडामार्ग अध्यक्ष महेश काळे, सावंतवाडी अध्यक्ष समीर जाधव, वेंगुर्ला अध्यक्ष सीताराम नाईक, सचिव प्रसाद जाधव, वैभववाडी सचिव महादेव शेटये, देवगडचे संदीप मिराशी, जगदीश शिंदे आदी उपस्थित होते.