सुप्रिया सुळेंचं सावंतवाडीत होणार जंगी स्वागत : अर्चना घारे-परब

Edited by: विनायक गावस
Published on: October 25, 2023 15:37 PM
views 230  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे या २७ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. दोडामार्ग येथे कार्यकर्ता मेळावा झाल्यानंतर सुप्रिया सुळे या सावंतवाडीतील यशवंतराव चव्हाण समुपदेशन केंद्र अर्चना घारे संपर्क कार्यालय येथे भेट देत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांची बैठक होणार असून त्यानंतर पत्रकारांशी त्या संवाद साधणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिली.

त्या म्हणाल्या, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्या सावंतवाडी मतदारसंघात येणार आहेत. तब्बल १० वर्षांनी त्या सावंतवाडी शहरात येणार आहेत. दोडामार्ग, बांद्यासह सावंतवाडीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी  ९ वा. बांदा येथे स्वागत केले जणार आहे. त्यानंतर महालक्ष्मी हॉल दोडामार्ग येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. त्यानंतर दुपारी सावंतवाडीतील यशवंतराव चव्हाण समुपदेशन केंद्राला त्या भेट देतील. त्यानंतर मॅगो वन येथे महाविकास आघाडीची बैठक होईल व त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या संवाद साधतील. याप्रसंगी त्यांच्याकडे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस, आडाळी एमआयडीसी, हत्ती प्रश्न, रोजगार आणि पर्यटन या विषयावर सभागृहात आवाज उठवण्यासाठी लक्ष वेधणार आहे अशी माहिती अर्चना घारेंनी दिली. तर या जास्तीत-जास्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन अर्चना घारे यांनी केले.

 संपूर्ण महाराष्ट्रात हा दौरा असून सुप्रिया सुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. दोडामार्गमध्ये त्यांचा महामेळावा होत असुन  इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच नेतृत्व त्या करत आहेत. भाजपला विरोध करण्यासाठी व आपली भुमिका मांडण्यासाठी त्या येत आहेत. त्यांच्या येण्यान कार्यकर्त्यांत उत्साह असून त्याचा परिणाम निवडणूकांत दिसून येईल असं मत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, महिला शहराध्यक्ष अँड. सायली दुभाषी आदी उपस्थित होते.