सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी दाखल केला अर्ज !

Edited by: ब्युरो
Published on: June 13, 2024 09:00 AM
views 413  views

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मुंबईतील विधानभवनात पोहोचल्या आहेत. दरम्यान मंगळवारी 25 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी आज (दि.१३ जून) विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला होता.

सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच महायुतीमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी कामाला लावले होते. मागील लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या संखेत राष्ट्रवादी काँग्रेसची मते मिळवल्यास सुनेत्रा यांचा विजय सहज होईल, अशी अटकळ बांधण्यात आली होती, मात्र सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला.