
कुडाळ : लिफ्ट दिलेल्या एका मोटारसायकलस्वाराला मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोटारसायकल, मोबाईल व रोख रक्कम घेऊन रात्रीच कुडाळ येथून पळ काढलेल्या परजिल्ह्यातील सेटिंग कामगार दोन युवकांना पकडण्यात कुडाळ पोलिसांना यश आले. शिवशरण सुभाष वालीकर ( 20 , रा.सातारा , नागे ठाणे ) व सुमित युवराज माचरेकर (19, रा.पुणे ) अशी या सशयितांची नावे असून त्यांना पुणे व सातारा येथे सापळा रचून ताब्यात घेतले. गुन्ह्यातील मोटारसायकलही ताब्यात घेतली. 14 दिवसापूर्वी कुडाळ - तुपटवाडी येथे ही घटना घडली होती. याबाबातची फिर्याद नीलेश प्रकाश जावकर ( 39 , रा माऊली कॉम्प्लेक्स कुडाळ ) यांनी कुडाळ ठाण्यात दिली होती.
11 ऑक्टोंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास श्री जावकर कुडाळ येथील माऊली कॉम्प्लेक्स ( केळबाई वाडी रस्ता) येथे आपल्या ताब्यातील मोटारसायकलने जात होते. तेव्हा माऊली कॉम्प्लेक्स अलीकडे तिघे जण चालत जात होते.त्यातील एक जास्तच दारूच्या नशेत होता.जावकर याना त्यातील एकाने थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे त्यांनी आपली मोटारसायकल थांबविली आणि त्यातील दोघांना कुडाळ गोधडवाडी येथे त्या कामगारांच्या खोलीवर सोडण्यासाठी ट्रीपल सीट गेले. त्यातील एक मागून चालत जात होता. एकाला त्या खोलिकडे सोडले आणी सोबत असलेल्या दुसऱ्याने आपण एकटा चालत येत असलेल्याच्या सोबतीला येतो असे सांगून जावकर यांच्या मोटारसायकल वरुन पुन्हा मागे आला.कुडाळ - तुपटवाडी येथे रेल्वे ट्रॅक नजीकच्या दर्गाजवळ चालत येणारा दिसल्याने जावकर यानी मोटारसायकल थांबविली.त्यानंतर मोटारसायकलच्या मागे बसलेला व चालत येत असलेल्या दोघांनीही जावकर याना मारहाण केली.त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल, एक मोबाईल व तीन हजार रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत तेथून पळून काढला होता. याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर शिवशरण वालीकर व सुमित माचारेकर यांची नावे चौकशित निष्पन्न झाली होती.
कुडाळच्या पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.त्यांना दोन्ही सशयीतबद्दल माहिती मिळाली.त्यानुसार सागर शिंदे यांच्यासह स्वप्नील तांबे ,शशीशेखर प्रभू ,हरेश पाटील आदींचे पथक सातारा व पुणे येथे रावाना झाले. सातारा येथून शिवशरण वालिकर याला या पथकाने ताब्यात घेतले.नंतर सुमित माचरेकर याला ताब्यात घेण्यासाठी. पुणे येथील एका हॉटेल कडे सापळा रचला.मोटारसायकलने तो तेथे आला.मात्र,या पोलीस पथकाला पाहताच तो पळ काढत असतानाच पोलीसानी त्याला पकडले. कुडाळ येथे या दोघांना आणून अटक करण्यात आली. 26 ऑक्टोंबर रोजी त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.














