पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ल्यातच होणार : रवींद्र चव्हाण

मंत्रालयात बैठक
Edited by: जुईली पांगम
Published on: January 02, 2024 15:43 PM
views 1238  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात प्रस्तावित असणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला अशी काही दिवसांपूर्वी बातमी आली होती. त्यावरून राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. आता यांसदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली. याबाबतचं ट्वीट रवींद्र चव्हाण यांनी करत हा प्रकल्प वेंगुर्लेतच होणार असल्याचं म्हणत विरोधकांना इशारा दिलाय. या बैठकीला पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी- शर्मा यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे हे व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते.

पाणबुडी प्रकल्पाबाबत पालकमंत्र्यांचं ट्वीट !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तसेच नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे. मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी विरोधक या प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यस्थिती व वस्तुस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे(एमटीडीसीकडे) वर्ग करण्यात आला आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही व सदर प्रकल्प सकारात्मक पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी उपस्थितांना दिले.


असा आहे पाणबुडी प्रकल्प !

२०१८ मध्ये सिंधुदुर्गामध्ये पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यापूर्वीही पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या अनेक प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली. सिंधुदुर्गच्या निवती रॉक्सजवळील समुद्रामध्ये पाणबुडी प्रकल्प येणार होणार आहे. सिंधुदुर्गमधील या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता येणार आहेत.