SPECIAL REPORT | राज्याच्या नव्या राजकारणाची 'रंगीत तालीम' सिंधुदुर्गात 'सक्सेस फुल' !

भाजपचा गेम प्लॅन यशस्वी
Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2023 15:30 PM
views 423  views

सावंतवाडी : दहा महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांची गणीतं राज्याच्या राजकारणात सुरूयत. भाजपच्या 'मिशन लोटस'चा हा एक भाग आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांना उधाण आलेलं असताना या नव्या समीकरणांची 'रंगीत तालीम' सिंधुदुर्गात सक्सेसफुल ठरलीय.


२०१९ पासून मागील चार वर्षांत राष्ट्रपती राजवटीसह तीन सरकारं महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलीत. यातलं तिसरं शिंदे सरकार सध्या महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. तर महाराष्ट्र साखरझोपेत असताना देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीसह दोन दिवसांच सरकार जनतेच्या अजूनही ध्यानात आहे. मध्यल्या राजकीय उलथापालथीनंतर पुन्हा एकदा अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची  जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.‌ अजित पवार यांच्याकडून यावर खुलासा केल्यानंतर देखील या चर्चा काही थांबायच नाव घेत नाहीयेत‌.


शिंदे फडणवीस यांच्या डबल इंजीन सरकारला पवारांची पॉवर मिळणार असल्याचा दावा राजकीय सूत्रांकडून केला जातोय. या चर्चा सुरू असतानाच तळकोकणात भाजपचा गेम प्लॅन मात्र सक्सेसफुल ठरलाय. भाजपच्या खेळीने सिंधुदुर्गात भाजप-राष्ट्रवादी एकत्र आलेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात भाजप- राष्ट्रवादीला एकत्र आणण्याची यशस्वी खेळी आखली. तर या नव्या राजकीय समीकरणाला केंद्रिय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी बळ दिल.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फायर ब्रॅण्ड नेते, अजित पवारांमुळे राज्यात भाजप- राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत मिळत असताना याच पार्श्वभूमीवर जिल्हा संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप - राष्ट्रवादी एकत्र आलेत. जिल्ह्यातील आठही खरेदी-विक्री संघावर भाजपच प्राबल्य असताना भाजपने जिल्हा संघाचं अध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादीच्या गळ्यात घातलीय. त्यात व्हिक्टर डॉन्टस हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू असून जिल्ह्याच्या सहकारात त्यांच वजन आहे. त्यामुळेच भाजपन हा 'मास्टर गेम' केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून भाजपची ही खेळी जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर आहेच पण राज्यातल्या आगामी राजकारणाची यशस्वी रंगीत तालिम असल्याचं मानलं जातंय.