मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचे सांगितले. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यावर आता कर्नाटक सरकारही जोरदार तयारीला लागले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी यासंदर्भात सीमाप्रश्नावर जे वकील लढा देत आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही गावे कर्नाटकात विलीन होणार असल्याचेही सांगितलं.
यावेळी बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जत तालुका कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला आहे. 40 ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या या तालुक्याने महाराष्ट्र सरकार त्यांना पाणी देण्यास असमर्थ असल्याचा ठराव संमत केला. जत तालुक्यातील 40 गावांना अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याने कर्नाटकात सामील व्हायचे आहे, असे बोम्मई म्हणाले.