शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरील हक्कावरून काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान काल (शुक्रवार) निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह हिसकावण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे सुपूर्द केले आहे.
दरम्यान, शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पालिकेतील आणि विधानभवनातील कार्यालये ताब्यात घेणार आहे, अशी माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची आणखी कोंडी करणार आहेत.
तसेच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गट शिवसेनेचा तांत्रिक भाग मानला जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना पाळावा लागणार आहे.
अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी बहुमताची गरज असल्याने ठाकरे गटाच्या आमदारांना देखील व्हीप बजावला जावू शकतो. याचे पालन न केल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.
भरत गोगावले म्हणाले, नियमाप्रमाणे पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे त्यांना आमचा व्हीप लागू होणार आहे.