'रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा आमचीच' ; शिंदे गटाचा दावा

Edited by: ब्युरो
Published on: April 02, 2024 07:48 AM
views 661  views

ब्युरो : महायुतीत शिंदे-गट आणि भाजपामध्ये अद्यापही काही जागांवरुन वाद सुरु असून, चर्चेचं घोडं अडलं आहे. भाजपाने ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ मागितला असून, शिंदे गटाची अडचण झाली आहे. दुसरीकडे भाजपाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. पण अखेर शिंदे गटासाठी त्यांनी मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली आहे. पण नारायण राणे समर्थकांनी जागा सोडण्यास नकार दिला असून, प्रचाराची तयारीच सुरु केली आहे. दरम्यान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

संजय शिरसाट यांनी महायुतीत काही वाद नसून, एक ते दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असा दावा केला आहे. "आमच्यात आलबेल नाही, भांडणं आहेत, तक्रारी असा प्रकार नाही. याउलट युतीच्या अनेक महिने पूर्वीपासून आघाडीमध्ये चर्चेला सुरुवात झाली होती. पण  जिथून सुरुवात झाली तिथे आघाडी थांबली आहे. वंचित त्यांच्यापासून दूर गेली आहे. आता ती जवळ येणं शक्यत नाही हे स्पष्ट झालं आहे. काँग्रेसने शरद पवार गटाच्या चिन्हावर की शरद पवार गटाने काँग्रेसच्या चिन्हावर लढावं याची लढाई सुरु झाली आहे. उबाठा गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काही ठिकाणी नावांची घोषणा झाली असून, तिथेही वाद आहे. अशा स्थितीत आघाडी टीकेल की नाही हा संभ्रम लोकांमध्ये आहे. त्याउलट युती किती लवकर होईल आणि लवकर आम्हाला प्रचार करता येईल असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. येत्या 2 दिवसांत याचा शेवट होईल," असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. 

"नारायण राणे उद्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. याला खुलासा, निर्णय आणि त्यावर बोलण्याचा अधिकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. जर त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली तरी आम्ही युती म्हणून त्यांचं काम करु. पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागेवर आजही आमचा दावा आहे. ती जागा शिवसेनेला मिळावी असा आमचा आग्रह आहे. नारायण राणे यांचा मानसही दिसतोय. पण वरिष्ठ निर्णय घेईपर्यंत आम्ही काही बोलणार नाही," असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.