शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत

उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 07, 2022 19:51 PM
views 288  views

ब्युरो न्यूज : एकनाथ शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी स्वेछेने पक्ष सोडला असल्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये ‘धनुष्यबाण’ चिन्हासाठी सुरु असलेली निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली असून आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाने शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर शनिवारी संध्याकाळपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाने पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना ८ ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. जर शिवसेनेच्या वतीने कोणतंही उत्तर आलं नाही, तर याप्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही निवडणूक आयोगाने पत्रात स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी, तसेच अध्यक्षपदी निवड केलेली असल्याने पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे, असा अर्ज शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता असल्याने या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे.

शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार, १८ पैकी १२ खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. तसंच प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे ‘मुख्य नेता’ तसेच अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. १४४ पक्षाचे पदाधिकारी आणि ११ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेनेचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांना पाठिंबा आहे, असं या अर्जात नमूद करण्यात आलं आहे. या दाव्याच्या पुष्टर्थ प्रतिज्ञापत्र तसंच अन्य कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत.