मुंबई : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला काही क्षणात सुरुवात होते आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या परवानगीच्या मुद्यावरुन देखील राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं मात्र, अखेर या मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे. अनेक दिवस मोर्चाला परवानगीची प्रतीक्षा होती. आता मुंबई पोलिसांकडून मोर्चाला लिखित परवानगी देण्यात आली आहे. भायखळा येथील पोलीस ठाण्यातून ही परवानगी देण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अटी, शर्टींसह ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत, मोर्चाला परवानगी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला गेला होता. परवानगी मिळाली नाही तरी आमचा मोर्चा होणारच असा पवित्रा देखील राजकीय नेत्यांनी घेतला होता.