पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांची सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी काल पुणे येथे सदिच्छा भेट घेतली. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी संस्था करीत असलेल्या कामाची माहिती देणे व विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेटिव्ह रिसर्चची आवड निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त करणे हा या भेटीमागचा उद्देश होता. या वेळी त्यांच्या सोबत मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर व डॉ. सचिन क्षीरसागर उपस्थित होते.
डॉ.माशेलकर हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (C.S.I.R.) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञान विषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य त्यांनी केले आहे. हळद, बासमती आणि कडुनिंब यांच्या पेटंट्स बाबतचा लढा यशस्वीपणे लढवून अमेरिकेकडून ही पेटंट्स परत मिळवण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले आहे.त्यांना आजमितीपर्यंत साठहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, शांतीस्वरूप भटनागर मेडल, मटेरियल सायंटिस्ट ऑफ द इयर, पं.जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, लंडन येथील रॉयल सोसायटी लंडनची फेलोशिप इ.अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. आयुष्यातली कमीत कमी बारा वर्षे अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.'व्यवसायाभिमुख संशोधन' या तत्त्वाचा त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 'ज्ञान ही संपत्ती आहे व ज्ञानातून संपत्ती निर्माण होते म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररित्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे' ही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. डॉ.माशेलकर यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांची सुमारे वीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.'व्यवसायाभिमुख संशोधन' या त्यांच्या तत्वाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, त्यासंबंधीचे त्यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील विदयार्थ्यांना मिळावे यासाठी अच्युत भोसले यांनी या भेटीत त्यांना विनंती केली. जिल्ह्यातील विद्यार्थी गुणवंत व सृजनशील आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास येथेही प्रतिभावंत शास्त्रज्ञ व वैज्ञानिक घडू शकतात असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.माशेलकर यांनी भोसले नॉलेज सिटीच्या कार्याची बारकाईने माहिती घेतली व आपला जन्म गोव्याचा असून शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी हितगुज साधायला आपणाला नक्की आवडेल असे सांगितले. येणाऱ्या काही दिवसात आपल्या दौऱ्याची तारीख व वेळ नक्की कळवू असे आश्वासनही त्यांनी भोसले यांना याप्रसंगी दिले.डॉ.रघुनाथ माशेलकरांसारख्या व्यक्तीने आपणाला बहुमूल्य वेळ दिला व विद्यार्थ्यांशी हितगुज करण्याचे आश्वासन दिले यासाठी अच्युत भोसले यांनी त्यांचे आभार मानले.