मुंबईत कारमधील सर्व प्रवाशांना उद्यापासून सीटबेल्ट सक्ती

सीटबेल्ट बसवण्याची दिलेली मुदत आज संपली ; उद्यापासून होणार दंड आकारणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 31, 2022 18:26 PM
views 250  views

मुंबई : गेल्या महिन्यात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं मुंबईजवळ पालघरमध्ये कार अपघातात निधन झालं. मिस्त्री हे मर्सिडीजच्या लग्झरी कारने प्रवास करत होते. या कारमध्ये सर्व प्रकारचे सेफ्टी फीचर्स होते, एअरबॅग्स देखील होत्या. परंतु अपघातात त्यांचं निधन झालं. त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता, त्यामुळे एअरबॅग्स असूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर देशभरातील लोकांच्या रस्ते प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच लोकांनी रहदारीचे नियम पाळण्याबाबतही चर्चा सुरू आहेत.


दरम्यान, प्रवाशांनी कारने प्रवास करताना सीट बेल्ट लावण्यावरही जोर दिला जात आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि प्रमुख शहरांमध्ये तिथल्या वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत मोहीमा हाती घेतल्या आहेत. अनेक शहरांमध्ये कारमधील प्रवाशांनी सीट बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमांची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. आता मुंबई शहरात देखील हा नियम लागू करण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी मुंबईत केली जाणार आहे. मुंबईत आता सहप्रवाशांना सीटबेल्ट लावणं सक्तीचं करण्यात आलं आहे.


मुंबईत आता कारमधील चालक, चालकाशेजारी आणि मागील सीटवर बसणाऱ्या अशा सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. १ नोव्हेंबरनंतर तुमच्या कारमधील कोणताही प्रवासी सीटबेल्टशिवाय दिसला तर तुमच्याकडून वाहतूक पोलीस दंड वसूल करू शकतात.


ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही, अशा वाहनांना सीटबेल्ट बसवून घेता यावा, यासाठी मुंबई पोलिसांनी १५ दिवसांची मुदत दिली होती. या मुदतीचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. बऱ्याच कार चालकांनी अद्याप सीटबेल्ट बसवून घेतलेला नाही. त्यामुळे मंगळवारपासून अशा चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.