
सावंतवाडी : शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवतीर्थ व बीकेसी मैदानावर शिंदे गट व उद्धव ठाकरे या दोन गटाचा दसरा मेळावा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातून ठाकरे गटाचे शेकडो शिवसैनिक मुंबईसाठी रवाना झालेत. तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली.
यावेळी राऊळ म्हणाले, दसरा मेळावा हा एकच जो शिवाजी पार्कवर होतो. आज शेकडो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघाले आहेत. या ठिकाणी शिवाजी पार्कवर ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडकणार असून विचारांचं सोनं इथं लुटलं जाणार आहे. आमच्यासोबत निष्ठावंत शिवसैनिक आहेत. जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. जनशताब्दी, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस अशा तीन रेल्वेतून ३०० हून अधिक शिवसैनिक सावंतवाडी तालुक्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिंदे गटाचा मेळावा हा खोटनाट करून होत आहे, कार्यकर्ते देखील तसेच जमवले जात आहेत. शिंदे गटाच्या मेळाव्या मागचा कर्ता करवीता वेगळा आहे असा आरोप राऊळ यांनी केला. यावेळी उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शिवदत्त घोगळे, आबा सावंत, दिनेश सावंत, संदीप गवस, संदीप माळकर, राजू शेटकर, तुकाराम कासार, उल्हास परब, विष्णू परब आदींसह शेकडो शिवसैनिक मळगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.














