महाड : 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. आजही ही घटना आणि त्यानंतरचे शोध कार्य अंगावर रोमांच उभे करते. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर- बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा यासह 40 जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले होते, त्यावेळेस फडणवीस सरकारने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता 165 दिवसांमध्ये नवीन पुल उभे केले, परंतु संबंधित खात्याने या पुलाकडे दुर्लक्ष केल्याने आज पुल धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सावित्री पुलावरील मध्य भागात लोखंडी चॅनलचे तुकडे झालेले असल्याने या पुलावरून वाहतुक करते वेळेस व्हायब्रेशन होत असल्याने तिथे उभे राहिले असता झुलत्या पुलावर उभे राहिल्यासारखे वाटत आहे, पुलाला दोन्ही बाजूला जोडणारा लोखंडी चॅनेल तुटल्यामुळे याठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित खात्याने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून प्रवाशांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.