दाऊदचा सहकारी 'सलीम कुत्ता' आहे कोण ?

विधीमंडळात का गाजतंय नाव ?
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 19, 2023 11:47 AM
views 381  views

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता या दोघांचा एक व्हिडिओ समोर आल्याने वादाला तोंड फुटले आहे. सलीम कुत्ता कोण आहे ? त्याने कोणते गुन्हे केले आहेत आणि त्याचं हे नाव का पडलं याची चर्चा सध्या होताना दिसत आहे.उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केल्याची घोषणा केली आहे.

सुधाकर बडगुजर हे शिवसेनेचे ठाकरे गटाचे नाशिक विभाग प्रमुख आहेत. तर सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा सहकारी आहे. 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सलीम कुत्ता दोषी आढळला होता. या दोघांचा एक व्हिडिओ समोर आल्याने वादाला तोंड फुटले आहे. बडगुजर आणि सलीम कुत्ता हे दोघे नाशिक येथे एका फार्महाऊसवर पार्टी करत असतानाचा हा व्हीडिओ आहे. त्यावरुन विधिमंडळात गदारोळ झाला आहे. 'हा सार्वजनिक कार्यक्रम होता आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण ओळखावे हे जरूरी नाही' असं हर्षा बडगुजर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. हा व्हीडिओ 15-16 वर्षं जुना आहे असं हर्षा बडगुजर म्हणाल्या होत्या. सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी बडगुजर यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा नितेश राणे, दादाजी भुसे आणि आशिष शेलार या सरकारमधील आमदारांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी आम्ही विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या घटनेमागे कुणाचा वरदहस्त आहे याची देखील सखोल चौकशी होईल. "दाऊदच्या गॅंगमधील सदस्य आणि संबंधित व्यक्ती हे दोघे नाचत असल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. तो पॅरोलवर असतानाचा हा व्हीडिओ आहे. पॅरोलवरील व्यक्तीला पार्टी देखील करता येत नसते. पार्टीपेक्षा हे महत्त्वाचं आहे की यातून काय संकेत जातो. बॉम्बस्फोटातील आरोपी सोबत जर कुणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ त्यांच्या संवेदना मेल्या आहेत.

भाजप आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचे फोटो विधानसभेत दाखवले."सलीम कुत्ताने एक पार्टी आयोजित केली होती आणि त्या पार्टीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते असे आ.राणे म्हणाले. माझ्याकडे या पार्टीचे व्हीडिओ देखील आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, असे राणे म्हणाले.जर राजकीय नेते आणि दहशतवाद्यांचे संबंध असतील तर आपलं राज्य आणि देश असुरक्षित राहील असं राणे म्हणाले.

नितेश राणेंनी सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ताचा फोटो दाखवल्यानंतर विधान परिषदेत गोंधळ उडाला. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी झाली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत भाजप नेते गिरीश महाजन यांचा फोटो दाखवला आणि हा फोटो सलीम कुत्तासोबतचा आहे असा दावा खडसेंनी केला. एका विवाह सोहळ्यात पालकमंत्री आणि काही आमदार उपस्थित होते असा खडसेंनी दावा केला. सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई होते. तर मग महाजन यांच्यावर का नाही ? एक मंत्री कसा काय बसू शकतो या प्रकरणाची देखील चौकशी करावी असं खडसे यांनी म्हटलं.

सुधाकर बडगुजर यांच्या मुद्द्याहून दिशाभूल करण्यासाठी गिरीश महाजन यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आल्याचं सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते ते लग्न मुस्लिम धर्माचे नाशिकचे असणारे शेर ए खातीम यांच्या पुतण्याच्या लग्नाला गेले होते. त्यांचा दाऊद सोबत कोणताही संबंध नाही. ज्या परिवारात लग्न झालं त्यांचा देखील कुठं ही दाऊदसोबत संबंध नाही. ज्यावेळी हे आरोप 2018 साली गिरीश महाजन यांच्यावर झाले त्यावेळी डीसीपी समिती नेमली होती. त्यामधे स्पष्ट करण्यात आलं की दाऊद सोबत त्याचा काही संबंध नाही. केवळ उद्धव ठाकरे आज सभागृहात आलेत त्यामुळं गिरीश महाजन यांच्यावर आरोप करण्यात आले. गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत असं फडणवीस म्हणाले.