सावंतवाडी : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा - २०२३ चा निकाल घोषित करण्यात आला आहे. यात राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पातूर, जिल्हा अकोला यांना द्वितीय पुरस्कार तिरंगा गणेशोत्सव मंडळ, यशवंतराव, विटा, ता. खानापूर, जि. सांगली यांना तर आणि तृतीय पुरस्कार मार्केट यार्ड मित्र मंडळ, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यांना जाहीर झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम क्रमांकाच मानकरी ठरलं आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मंडळाला हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २ लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख इतक्या रकमेचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. याशिवाय ३६ जिल्ह्यांसाठीही जिल्हानिहाय पारितोषिक विजेते जाहीर करण्यात आले. जिल्हास्तरीय पारितोषिकाचे स्वरूप प्रत्येकी रुपये २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पार पडला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणातील पहिल्या सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. गेली ११८ वर्ष या मंडळाकडून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने निघणारी विसर्जन मिरवणूक ही विशेष आकर्षण असतं. यावर्षी महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा साकारत गड किल्ले संवर्धनाचा संदेश मंडळान दिला होता.
राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम येण्याच मान मंडळान पटकाविला होता. आज सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे राजू भाट, राजा स्वार, प्रतिक बांदेकर, प्रसाद नार्वेकर, प्रथमेश विर्नोडकर आदी उपस्थित होते. याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सालईवाडा गणेशोत्सव मंडळावर केला जात आहे.