महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर 19 डिसेंबरला सिंधुदुर्गात

'महिला आयोग आपल्या दारी'चं निमित्त
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 11, 2024 17:40 PM
views 172  views

सिंधुदुर्गनगरी :  राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत सिधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारीची जनसुनावणी गुरुवार दि. 19 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय  सिंधुदुर्ग येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारीची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात या जनसुनावणीत महिलानी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा, रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा,  रुपाली चाकणकर दि. 19 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत, महिलांना त्यांच्या  जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचें निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपर्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. "महिला आयोग आपल्या दारी" अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे.