मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरता येऊ नये, यासाठी शिंदे गटाकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत लिपीक आहेत. मात्र, त्यांच्या नोकरीचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेकडून जाणीवपूर्वक मंजूर केला जात नाही. त्यासाठी पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर शिंदे गटाकडून दबाव आणला जात आहे. शिंदे गट ऋतुजा लटके यांच्यावरही दबाव आणत आहे. तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा, तुमचा नोकरीचा राजीनामा लगेच मंजूर होईल, असे शिंदे गटाकडून लटके यांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर शिंदे गटात प्रवेश केल्यास ऋतुजा लटके यांना मंत्रिपदाची ऑफरही असल्याची माहिती आमच्याकडे असल्याचा दावा शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अनिल परब यांनी शिंदे गटावर अनेक गंभीर आरोप केले.
रमेश लटके हे कडवे आणि निष्ठावान शिवसैनिक होते. ते तीन टर्म आमदार राहिले होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली होती. पालिकेत लिपीक म्हणून काम करत असलेल्या ऋतुजा लटके यांनी २ सप्टेंबरला पहिल्यांदा नोकरीचा राजीनामा दिला. राजीनामापत्रात लटके यांनी आपला राजीनामा अंधेरी पोटनिवडणुकीनंतर मंजूर करण्यात यावा, असे म्हटले होते. ती गोष्ट चुकीची होती. त्यामुळे पालिकेने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. एक महिना झाल्यानंतर ऋतुजा लटके राजीनाम्याच्या अर्जाचे काय झाले हे विचारायला गेले तेव्हा तुमचा अर्ज चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याने राजीनामा मंजूर करता येणार नाही, असे म्हटले. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी ३ ऑक्टोबरला पुन्हा एकदा राजीनाम्याचा अर्ज केला. पण पालिकेने पहिल्याचवेळी त्यांची चूक लटके यांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे हपालिकेच्या नोकरीचा राजीनामा देताना एका महिन्याची नोटीस देणे आवश्यक आहे. तसेच त्या महिन्याचा पगार राजीनामा देताना जमा करावा लागतो. ऋतुजा लटके यांच्यावर आजपर्यंत नोकरीत शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. त्या महानगरपालिकेचे कोणतेही देणे लागत नाहीत. त्यांनी सगळ्या नियमांचे पालन केल्यामुळे पालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर करावा, अशी विनंती केली होती. अतिरिक्त आयुक्त स्तरावर त्यांचा राजीनामा मंजूर व्हायला पाहिजे होते. मात्र, आता लटके यांच्या राजीनाम्यावरुन पालिकेच्या विभागांकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. मी स्वत: पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना तीनदा भेटलो. ऋतुजा लटके यांचा राजीनामा का मंजूर होऊ शकत नाही, याचे कारण मला लिहून द्या, अशी मागणी मी केली. परंतु, महापालिकेकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. या सगळ्यामागे शिंदे गटाकडून पालिका आयुक्तांवर टाकण्यात येणारा दबाव कारणीभूत आहे. शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यावरही दबाव आणला जात आहे. तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा, तुमचा राजीनामा लगेच मंजूर करु, असे त्यांना सांगण्यात आले आहे.