विलासराव देशमुखांचा किस्सा सांगत रितेशचं राजकारणावर परखड भाष्य !

Edited by: ब्युरो
Published on: February 18, 2024 11:29 AM
views 76  views

लातूर : लातूर ही विलासराव देशमुख यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. लातूरमध्ये देशमुख कुटुंबियांना माननारा एक मोठा वर्ग आहे. आज लातूरमधील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी विलासरावांचे सुपुत्र, अभिनेते रितेश देशमुख यांनी केलेले भाषण लक्षवेधी ठरले. विलासरावांच्या राजकीय जीवनातील चरित्राचा हवाला देऊन रितेश देशमुख यांनी हल्लीच्या राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर परखड भाष्य केलं. विलासराव माणूस म्हणून काय होते त्याची प्रेरणा आपण घेतली पाहीजे, असे रितेश देशमुख म्हणाले.

“समाजात, कुटुंबात वेगवेगळ्या भूमिका साकारताना तुम्ही लोकांशी कसे वागता, हे खरे भांडवल असतं. माझे आजोबा आणि वडील विलासरावांचे नाते अतिशय आदरयुक्त होतं. आपला मुलगा मुख्यमंत्री झाला, याचे आजोबांना कौतुक होतं. पण त्यांना कुठली गोष्ट खटकली तर ते आवर्जून सांगायचे. विलासराव लातूरला आले की, ते आजोबांची भेट घ्यायला जुन्या घरी जायचे. एकदा असेच भेटायला आले असताना आजोबांनी जुन्या वर्तमानपत्रातील बातमी बाबांना दाखविली. आजोबा म्हणाले, या बातमीत तुमचे भाषण छापून आले आहे. या भाषणातील तुमची टीका थोडी वैयक्तिक होत आहे. राजकारणात टीका करत असताना व्यक्तिगत टीका करू नका, असे आजोबांनी सांगितलं”, अशी आठवण रितेश देशमुख यांनी सांगितली.

ही आठवण सांगत असताना रितेश देशमुख म्हणाले की, हा प्रसंग बाबांनी म्हणजे विलासरावांनी आम्हाला आवर्जून सांगितला. त्याचे कारण म्हणजे आम्हीही समाजात वावरताना ही खबरदारी घ्यावी. यालाच संस्कार म्हणतात. हाच वारसा आम्ही सर्व भावडांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. आजकाल राजकारणात कुठल्या पातळीवर जाऊन भाषणं होतात, हे पाहून दुःखं वाटतं. जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यांनी गाजवला, तो काळ आपल्याला आज दिसत नाही. तो काळ परत आणण्याची गरज आहे, असे परखड भाष्य रितेश देशमुख यांनी केलं.