कुडाळ : शिवसेनेच्या दोन गटातला घनघोर संघर्ष गेले काही दिवस टोकाला गेला होता. अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने कुठेतरी सौजन्य सप्ताह सुरू असल्याचे संकेत मिळू लागले असतानाच कुडाळच्या ठाकरे गटाच्या आंदोलनाने आगीत तेल ओतले आहे. आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी झाल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
मोर्चानंतर झालेल्या मेळाव्यात काही वाक्यांनी भाजप आणि शिंदे गटात वर टीका केली. मात्र यात सर्वात लक्षवेधी भाषण ठरलं ते भास्कर जाधव यांचा आमदार भास्कर जाधव हे आपल्या सडेतोड भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. कालच चिपळूण मध्ये भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांची मिमिक्री केली होती त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता त्यामुळे आज कुणाच्या सभेत भास्कर जाधव काय बोलणार याकडे लक्ष लागून होते.
अपेक्षेप्रमाणे भास्कर जाधव यांनी कुडाळ मध्ये तुफान बॅटिंग केली. आपल्या भाषणात राणेंवर जोरदार हल्लाबोल केला निलेश राणे यांच्या चिपळूणमधील भाषणाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मिमिक्री केली. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या भाषणाला तुफान प्रतिसाद मिळाला. शिवसेनेतील दोन गटातील संघर्षाच्या आगीत जणू तेल ओतण्याचे काम भास्कर जाधव यांच्या या भाषणाने होणार आहे. आता या भाषणाला शिंदे गट आणि भाजपाकडून कसे आणि कोण प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागून आहे.