सरिता पवार यांच्या 'राखायला हवी निजखूण'चं दुसऱ्या आवृत्तीचं पुण्यात प्रकाशन !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 17, 2024 14:19 PM
views 131  views

कणकवली :  कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण मधील कविता ह्या संयत विद्रोहाचे प्रतिक आहेत. सध्याच्या धर्मांध वातावरणाच्या पार्श्वभूमीवर रामा सारखा पती नाकारण्याचे धैर्य स्वयंसिद्धा कवितेत दाखवले आहे. इतक्या अल्पावधीत कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती येणं निश्चितच त्या कविता संग्रहाचे नोंद घ्यावे असे निर्विवाद यश आहे. समाजात परिवर्तनवादी आणि तितकेच सकारात्मक बदलाची अपेक्षा पवार यांच्या काव्यातून व्यक्त होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील परिवर्तनशील जेष्ठ लेखिका  आशालता कांबळे यांनी केले. कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी कांबळे बोलत होत्या.  मराठी साहित्य क्षेत्रात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवलेल्या आणि साहित्य रसिक, समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पुणे येथे निवारा सभागृहात नुकतेच समारंभपूर्वक झाले.

      मिळून साऱ्याजणी मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या समारंभात  परिवर्तनशील लेखिका आशालता कांबळे ,  मिळून साऱ्याजणीच्या संपादिका गीताली वि. मं. आणि रमाई मासिकाच्या संपादिका रेखा मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

  यावेळी विक्रम शिरतोडे आणि स्वरूपा चव्हाण यांनी सरिता पवार यांच्या कवितांचे उत्कृष्ट अभिवाचन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन 8 जानेवारी 2023 रोजी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. केवळ वर्षभरात वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई, बुलढाणा जिल्ह्यातील  5 राज्यस्तरीय  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

       यावेळी सभागृहात महाराष्ट्रातील साहित्य, नाट्य - चित्रपट क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची सन्माननीय उपस्थिती होती.