राज यांचा दौरा मनसेला देणार नवी ताकद | जीजी उपरकर अँक्शन मोडमध्ये !

पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी व बैठकांवर भर
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 30, 2022 09:24 AM
views 251  views

कणकवली : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या दोन गटात कडवा संघर्ष पेटला असतानाच मनसे आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. मनसेचे नेते परशुराम उर्फ जीजी उपरकर 'ॲक्शन मोड'मध्ये असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा झंझावाती दौरा कोकणात मनसेला नवे बळ देणारा ठरणार आहे. 

कोकणातील राजकारण हे नेहमीच संवेदनशील राहिले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात आज शिवसेनेतील दोन गटात कडवा संघर्ष सुरू आहे. या दोन्ही गटांचा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता मनसे पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवणार आहे. यासाठी राज ठाकरे यांचा आज झंझावाती दौरा होत आहे. या दौऱ्यात ते विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. अर्थातच पक्ष भक्कम करण्याबरोबरच आगामी राजकारणाची दिशाही यात ठरणार आहे. 

मनसेचे नेते परशुराम उपरकर हे राजकारणातील अभ्यासू व अनुभवी नेते आहेत. कोकणातील अनेक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. अगदी स्थानिक विकास कामांमधील भ्रष्टाचाराबाबतही ते जाहीररित्या मनसेचा आवाज बुलंद करणार करताना दिसतात. साहजिकच त्यांच्या या कार्याला राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे एक नवे बळ मिळणार असून मनसे पुन्हा एकदा कोकणात ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

कोकणात राज ठाकरे यांचा विचार मानणाऱ्या आणि त्यांच्या विचाराला पाठिंबा देणाऱ्या युवकांची संख्या लक्षणीय आहे. ही ताकद एकत्रित करून मनसे कोकणात आपली जादू दाखवेल. त्यासाठी राज ठाकरे यांचा दौरा हा पक्षाला नवे बळ देणारा असेल. त्याचबरोबर जीजी उपरकर यांच्यासारख्या अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्वाला नवी ताकद देणारा ठरेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.