कणकवली : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यादरम्यान शुक्रवारी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी तेली यांचे नवविवाहित सुपुत्र प्रथमेश तेली व सौभाग्यवती तेली यांची भेट घेत नवदांपत्यास शुभ आशीर्वाद दिले. यादरम्यान राज ठाकरे यांच्या सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते.
राज ठाकरे व राजन तेली यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा रंगल्या होत्या. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून राजन तेली यांच्या सुपुत्राच्या विवाहाच्या वेळेसही विविध पक्षांच्या नेत्यांनी व अर्ध्या मंत्री मंडळाने सावंतवाडी येथे हजेरी लावली होती. शुक्रवारी राज ठाकरे यांनी देखील तेली यांच्या घरी जात त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
शिवसेनेत असताना राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राजन तेली यांनी काही काळ काम केले होते. दरम्यान, शुक्रवारच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या या भेटीमुळे काही नवी राजकीय समीकरणे जुळतील काय? याबद्दल देखील राजकीय वर्तुळातून चर्चेला उधाण आले आहे.