
सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई - मडगाव अशी धावणार आहे. या गाडीचे आरक्षण आजपासून सुरू झाले आहे. मुंबई -मडगाव मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या धर्तीवर ही गाडी असणार आहे. कोकणात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने या गाडीची घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिस ते मडगाव जंक्शन दरम्यान एक ही विशेष गाडी (क्र. ०११७१ ) धावणार आहे.
गाडीचे वेळापत्रक असे - ही गाडी मुंबईतून १४ जून २०२५ सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता ती मडगावला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम येथे थांबेल. गाडीला आधुनिक एलएचबी डबे असतील. यात एक विस्टा डोम कोचचाही समावेश आहे. ३ चेअर कार, १० सेकंड सीटिंग डबे, एक एसएलआर आणि एक जनरेटर कार असेल.