कोल्हापूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 5 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधींचा हा दौरा खास असणार आहे कारण, यावेळी राहुल गांधी कोल्हापूरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. राहुल गांधी कोल्हापुरात होणाऱ्या ‘संविधान सन्मान संमेलनात’ विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत संवाद साधणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने हा दौरा नक्कीच प्रदेश काँग्रेसला उर्जा देणारा ठरणार आहे.
कसबाबावडा येथील भगवा चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते केले जाणार असल्याने याकरिता सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. यावेळी काँग्रेस पक्षानं सांगितलयं की, संमेलनात सहभागी असणाऱ्या सर्व संघटनांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत संविधानासंदर्भात विस्तृत चर्चा केली जाणार असून प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.
त्याचबरोबर गुरुवारी किंवा शुक्रवारी (ता. 27) राहुल गांधी यांचे पथक कोल्हापुरात येऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी करणार आहेत. कार्यक्रमस्थळ आणि परिसराची पाहणी करून सुरक्षा तैनात केली जाणार आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा राहुल गांधी करणार आहेत. याआधी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राहुल गांधी सांगलीतील सोनहीरा साखर कारखाण्यावर आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्याने राहुल गांधींचे महाराष्ट्र दौरे वाढले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.