ब्युरो न्यूज : पुणे-नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, या गाडीचा शुभारंभ रविवारी १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.या मार्गासाठी गेल्या दोन वर्षांपासून मागणी सुरू होती. मात्र आता ती प्रत्यक्षात उतरवली जात आहे, त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याआधीच सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यांच्या निर्देशानंतर रेल्वे बोर्डाने आवश्यक बैठकांचे आयोजन केले. नुकतीच झालेल्या उच्चस्तरीय व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये रेल्वे बोर्डाचे प्रधान सचिव सतीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, पुणे-नागपूर-पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.
ही गाडी नागपूर मधून सकाळी ९.५० वाजता सुटेल आणि रात्री ९.५० वाजता पुण्यात पोहोचेल. सध्या नागपूर-पुणे दरम्यानचा प्रवास १५ तासांपर्यंत जातो, मात्र वंदे भारत एक्सप्रेसमुळे हा कालावधी सुमारे ३ तासांनी कमी होऊन १२ तासांवर येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि प्रवास अधिक सुसह्य होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसण्याची सोय असली तरी, प्रवासाचा कालावधी जास्त असल्यामुळे प्रवाशांकडून आरामदायी आसनव्यवस्थेची मागणी करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने याची नोंद घेत बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.ही सेवा सुरू झाल्यानंतर पुणे आणि नागपूर यांच्यातील व्यवसायिक संबंध, शिक्षण आणि पर्यटनाला चालना मिळेल. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी हा प्रवास आता अधिक सोयीचा ठरणार आहे.
या गाडीच्या उद्घाटनानंतर रेल्वेच्या अमृत भारत योजना आणि स्थानक पुनर्बांधणी प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला आहे.त्यामुळे या मार्गावरील स्थानकांचीही सुविधा सुधारली जाणार आहे.