
सिंधुदुर्ग : नुकताच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला. त्यानंतर ‘भगवा दहशतवादा’च्या काँग्रेसी षड्यंत्राचा बुरखा फाटला. यानंतर सारवासारव करतांना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी ‘भगवा दहशतवाद’ म्हणू नका, तर ‘सनातनी दहशतवाद’ म्हणा, असे म्हणत सनातन धर्मावर पुन्हा टीका केली. त्याविषयी स्पष्टीकरण देतांना त्यांनी धर्माला नव्हे, तर मी सनातन संस्थेला ‘आतंकवादी संघटना’ म्हणाले, असे वक्तव्य केले. हे वक्तव्य खोटे, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असून या प्रकरणी सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्या वतीने त्यांना १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेची बिनशर्त माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिला आहे.
या नोटिसीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी माफी मागणे, मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने ती माफी प्रसिद्ध करणे, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने न करणे आणि १० हजार रुपये कायदेशीर खर्च भरपाई देणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेचे मानद कायदेशीर सल्लागार तथा मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांनी नोटिशीत म्हटले आहे की, चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतीमा मलीन झाली असून हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार आहेत.
या विषयी अधिक माहिती देतांना अभय वर्तक पुढे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण आज सांगत आहेत की, ‘भगवा’ हा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा, छत्रपती शिवरायांचा, संत ज्ञानेश्वरांपासून सर्व संत आणि वारकर्यांचा पवित्र भगवा आहे. त्यामुळे कोणीही “भगवा दहशतवाद’’ असे कोणी म्हणू नये, असे काँग्रेसी नेत्यांना आवाहन करत आहेत; पण जेव्हा मालेगाव प्रकरण झाले, त्या वेळी काँग्रेसी नेते पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांनी यथेच्छ ‘भगवा दहशतवाद’ म्हणत हिंदूंना लक्ष्य केले. तेव्हा चव्हाण यांना ‘भगवा’ छत्रपतींचा आहे, संतांचा आहे, हे लक्षात आले नाही का? इतकी वर्षे ते झोपले होते का?, असेही वर्तक यांनी म्हटले आहे.