सावंतवाडी : आषाढी एकादशी निमित्त कोकणातील प्रतिपंढरपूर असणार सावंतवाडीतील विठ्ठल-रखुमाई मंदिर हरीनामानं दुमदुमून गेल. पहाटेचा काकडा, महाआरती, दुग्धाभिषेक स्नानान विठ्ठल भक्तांच्या डोळ्याचं पारण फिटलं. आषाढी एकादशीच्या महापुजेचे मानकरी डॉ प्रवीण मसुरकर व प्राजक्ता मसुरकर या दांपत्यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची पुजा पार पडली. शहरासह तालुक्यातील विठ्ठल भक्तांनी विठूरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती.
आषाढी एकादशी निमित्त गेले सात दिवस अखंड हरिनाम वीणा सप्ताह विठ्ठल-रखुमाई मंदिरात भक्तिभावानं सुरु आहे. दररोज भजन, आरती, पुजा, होमहवन, किर्तन, प्रवचन आदी धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम होत आहेत. गुरुवारी देवशयनी आषाढी एकादशीला प्रतिपंढरपूरात सकाळी ६ वाजता अभिषेक स्नान, काकडा आरती, महाआरती पूजा मानकरी डॉ प्रवीण मसुरकर व कुटुंबियांच्या हस्ते पार पडली. तर दुपारी संगीत सद्गुरु विद्यालयाचा भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. सायंकाळी ह.भ.प. प्रा. सौ. स्मिता प्रभाकर आजेगावकर पुणे या संत कानोपात्रा चरित्र कथन केलं. सकाळपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. विठूरायास तुळशीमाळ अर्पण करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तर शुक्रवार ३० जून रोजी संत बोधले पाटील, शनिवार दि.१ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता संत सखु आख्यान, रविवार दि.२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सौ विना विठ्ठल परब मालवण यांचे कीर्तन, सोमवार दि.३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता वासुदेव सडवेलकर बुवा यांचे काला कीर्तन, सकाळी १० वाजता पालखी विठ्ठल मंदिर भडवाडी कडून परत येणार आहे. यावेळी उपस्थित रहायचे आवाहन विठ्ठल मंदिर कमिटी व विठ्ठल मंदिर सप्ताह उत्सव कमिटीने केल आहे.