मालवण : यावर्षीचा नौसेना दिन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवणात होत आहे. मालवण वासियांना या दौऱ्याची उत्सुकता लागून असणाचं आता शहर वासियांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. चार डिसेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय एक ते चार डिसेंबर कालावधीत अनेक निर्बंध घालण्यात आले असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, दिनांक 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत शहरातील दुकानांसमोर रस्त्यावर सायकल, दुचाकी, चारचाकी अशी वाहने ही रस्त्यावर उभी करू नयेत. रस्त्यापासून 20 मिटर आत वाहने पार्क करावीत. आणि जर वाहने पार्क करण्यास सुविधा नसल्यास रॉक गार्डन पार्किंग, नगरपरिषद पार्किंग, डॉ. बानवेलीकर यांचे जागेत तारकर्ली नाका पार्किग, टोपीवाला हायस्कूल, भंडारी हायस्कूल, दांडी बीच, मोरयाचा धोंडा, याठिकाणी नेमून दिलेल्या पार्किंग मध्ये आपली वाहने उभी करण्यात यावी. चार डिसेंबर रोजी अतिमहत्वाच्या कामाशिवाय विनाकारण दुकान उघडूही नये आणि कोमी रस्त्यावर सुद्धा येऊ नये. बोर्डिंग ग्राउंड ते देउळवाडा दुपारी 2 ते 6 वा. तसेच देउळवाडा ते तारकर्ली दुपारी 3 ते 9 वा या मार्गावर कोणीही येऊ नये. जर आपल्या दुकान, घर परिसरातील झाडांच्या फांद्या, झावळे रस्त्यावर आली असल्यास ती दिनांक 1 डिसेंबर पूर्वी आपल्या स्तरावर तोडून टाकण्यात यावीत. तसेच सुकलेले नारळ देखील काढून घेण्यात यावेत. महत्वाचे म्हणजे 4 डिसेंबर रोजी आपल्या मालकीची कोणत्याही प्रकारची जनावरे म्हणजे बैल, कुत्रा, गाई, म्हैस, कोंबडी, इ. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ताब्यात ती रस्त्यावर येणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी. तसेच दुकान, इमारतीवर लावण्यात आलेले फलक आपल्या स्तरावर काढण्यात यावेत. दुकान, इमारतीत कोण अनोळखी इसम राहण्यास आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस ठाण्यात द्यावी. तसेच ज्वलनशील पदार्थ सुरक्षित ठेवण्यात यावे असे आवाहन मालवण पोलिसांनी केले आहे.