छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीच्या संस्थांवर हल्ला करणाऱ्या राज्यकर्त्यांना या पूर्वीही सर्वसामांन्यांनी नाकारले आहे. तोच विचार लोकसभेच्या निवडणुकीतही ते करतील पण त्यासाठी विरोधी पक्षाने विश्वासार्ह पर्याय उभा करून देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. येथील एमजीएममध्ये मंगळवारी आयोजित ‘सौहार्द बैठकी’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
देशातील विविध राज्यात भाजपचे सरकार नाही. दक्षिणेतील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये तर नाहीच, पण खूप ताकद लावूनही कर्नाटकात भाजपला यश मिळाले नाही. गुजरात आणि उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य आहे. पण गोव्यामध्ये ते नव्हते. मध्यप्रदेशात ते बदलण्याचे प्रयत्न झाले. झारखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब यासह अनेक राज्यात भाजपचा विचार जनतेने केला नाही. राज्य सरकारने निवडून देताना केला जाणारा हा विचार लोकसभा निवडणुकीतही होऊ शकतो. मात्र, त्यासाठी आम्ही लोकांनी विश्वासार्ह पर्याय द्यायला हवा असे पवार म्हणाले. लोकांनी संसदीय लोकशाहीच्या संस्थात्मक रचनेवर हल्ला करणाऱ्यांचा नेहमी वेगळा विचार केला आहे.
इंदिरा गांधींसारख्या तत्कालीन शक्तिशाली नेतृत्वाचाही पराभव केल्याचा इतिहास देशातील मतदारांनी रचलेला असून यातून लोक शहाणपणाने निर्णय घेतात हेच अधोरेखित झाले आहे. आताही लोकशाहीसारख्या प्रमुख संस्था दुबळय़ा करण्याचे काम होत असून सरकार आणि विरोधी पक्षांमधील सुसंवाद हरवत चालला असल्याचे पवार यांनी सांगितले. अगदी धार्मिक कटुता असणाऱ्या हिंदू – मुस्लीम प्रश्नावरही सुसंवाद घडवून आणल्याचे उदाहरण सांगितले. या प्रसंगी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, लेखक डॉ. शेषराव चव्हाण यांच्यासह आयोजक राजेंद्र दाते पाटील, प्रा. डॉ. मिच्छद्र गोर्डे आदींची प्रमुख उपस्थिती होती