मुंबई : कोरोनाकाळात साथीचा प्रभाव वाढल्याने मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून पॅरोलवर सोडलेले ४५१ कैदी फरार झाले असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या कैद्यांना शोधण्याची अवघड जबाबदारी मुंबई पोलीसांवर पडली आहे. या काही कच्च्या कैद्यांचा तर काही दोषी ठरलेल्या कैद्यांचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या कैद्यांना शोधून त्यांना परत आणण्यासाठी पोलीसांनी भादंवि कलम ३५७ अंतर्गत कारवाई करण्याची मोहिम सुरू केली आहे.
साल २०२१ मध्ये कोरोनाची साथ पसरल्याने देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. २७ मार्च पासून देशभरात कोविडची टाळेबंदीची घोषणा झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. या काळात मुंबईतील सर्वात मोठ्या आर्थर रोड कारागृहात अत्यंत दाटीवाटीने असलेल्या कैद्यांना संसर्गाच्या भीतीने पॅरोलवर सोडले होते. त्यातील ४५१ कैदी पॅरोलची रजा संपल्यानंतर हजर झालेच नाहीत. त्यामुळे तुरूंगप्रशासनात खळबळ माजली आहे. या कैद्यांना शोधायचे कसे हा गहन प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. कोरोनाकाळात कोविड-१९ साथीचा वाढता प्रकोप पाहून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने मानवीय भूमिकेतून आर्थर रोड कारागृहाच्या तब्बल १४ हजार कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडले होते. त्यात काही आरोपपत्र दाखल न झालेले कच्चे कैदी होते. तर काही गुन्ह्यात आरोपपत्र दाखल होऊन खटला उभारून न्यायालयाने दोषी ठरविलेले आरोपीही होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या पॅनेलने या कैद्यांना कोविड साथीचा संसर्ग टाळण्यासाठी तुरूंगातील संख्या कमी करण्यासाठी पॅरोलवर सोडावे अशी शिफारस केली होती. त्यानंतर चार हजार दोषी आरोपींसह एकूण १४ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातील चार हजार दोषी ठरलेल्या कैद्यांनी त्यांचा पॅरोल संपताच पुन्हा आपल्या बराकीत परतणे अपेक्षित असताना ते त्यांच्या बराकीत परतलेच नसल्याचे उघडकीस आले आहे. या फरार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी आता भादंवि कलम ३५७ अंतर्गत कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.