
कागल : अनादी अनंत सत्तेवर ज्यांची श्रद्धा व भक्ती आहे, त्यांना अनादी सत्तेच्या माध्यमातून दिव्य संरक्षण मिळत असते. धर्ममूल्यांवरील विश्वास दृढ करण्यास या दिव्य संरक्षणाच्या घटना साहाय्यभूत होतात. देवतांच्या अनेक अवतार कार्यांद्वारे तसेच साधुसंतादी विभूतींच्याद्वारे बोध करूनही दिव्य संरक्षण दिले जात असते. असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित चैत्र पौर्णिमेनिमित्त प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी सकाळी श्री दत्त मंदिरामध्ये श्री दत्तगुरुचरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. रात्री ठीक साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, "अनादी अनंत अशा सर्वोच्च सत्तेच्या माध्यमातून केले जाणारे संरक्षण म्हणजे दिव्य संरक्षण होय. सृष्टी व्यवस्थित राहावी, निसर्गचक्र व्यवस्थित राहावे यासाठी निसर्गाचे नियम आहेत. सृष्टीला धर्माचा आधार आहे. धर्म सुरक्षित राहिल्यास सृष्टी सुरक्षित राहील. धर्माचे रक्षण व्हावे यासाठी अवतार होत असतात. मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वामन अवतार, राम, श्रीकृष्ण इत्यादी अवतार हे विष्णू अवतार म्हणून ओळखले जातात तसेच हनुमान, ज्योतिबा, खंडोबा आदी अवतार हे शिव अवतार म्हणून ओळखले जातात. हे सगळे अवतार धर्म रक्षणासाठी झाले आहेत. माणसाने धर्माने वागावे यासाठीच अवतार कार्य आहे. धर्ममूल्यांचे संरक्षण महत्त्वाचे आहे. त्यासंबंधाने एक उदाहरण पुढील प्रमाणे आहे.
विधृष्ट राजा व्यसनी होता. तो सगळ्या प्रधानांसह इतरही अधिकारी समूहाला बरोबर घेऊन दारू प्यायचा. राजा बेवडा असल्याने जनताही बेवडी झाली. राज्यात अराजकता माजली. तेव्हा इंद्रदेवाने एका व्यक्तीच्या रूपात येऊन राजाला दारूचे दुष्परिणाम सांगितले. राजाला बोध केला. तेव्हा राजाचे डोळे उघडले. राजाने व्यसन सोडले. अशाप्रकारे इंद्रादी विशेष विभूतींद्वारेही धर्माचे दिव्य रक्षण केले जाते. फक्त दारूचे व्यसनच नव्हे तर अनेकांना अनेक दुर्गुण असतात. दारू पिण्याचा अशुभ आरंभ करू नये. प्रत्येकासाठी सुधारण्याचा बोध करण्यास प्रत्यक्ष इंद्रदेवच येतील, असे नाही. घरातील लोकसुद्धा सुधारणा व्हावी म्हणून सांगत असतात. ते समजून घ्यावे. व्यसनाधीन आणि अधर्माने वागणाऱ्यांकडे सारासार विचार करण्याचे बळ राहिलेले नसते. कोणत्याही स्वरूपाची नशा ही वाईटच असते. मद निर्माण झाल्या कारणाने तो मद माणसाला सारासार विचार करण्यापासून दूर ठेवतो. रूप, धन इत्यादी अष्टमद हे नशा उत्पन्न करतात. दारूच्या व्यसनाचा पॅन्क्रियाज, हृदय, लिव्हर आदी इंद्रियांवर वाईट परिणाम होत असतो. दारू ही पापांची आई आहे. कोणीही व्यसनाधीन होऊ नये. घरातील ज्येष्ठ, वयस्क व्यक्तींनी तर नव्या पिढीची जास्त काळजी घ्यावी. व्यसनांपासून परावृत्त करावे.
या सृष्टीमध्ये धर्ममूल्यांच्या संरक्षणासाठी दुर्व्यसनांचे निवारण महत्त्वाचे आहे. पुष्कळदा अनेकांचे जीव हे दिव्य संरक्षणामुळे वाचतात. भूकंपानंतर दोनशे तास ढिगाऱ्याखाली जिवंत राहणे हे दिव्य स्वरूपाचे संरक्षण आहे. ही घटना तुर्कस्थानामध्ये अलीकडेच घडली. अनादी सत्तेच्या माध्यमातून दिव्य संरक्षण होत असते. भक्तिभाव असल्यास तामसीविद्यांचा परिणाम होत नाही.
आंध्र मधील जदुपुडी येथील यल्लमा देवी मंदिरामध्ये चोरी करण्याचा चोराचा प्रयत्न दिव्य संरक्षणामुळे असफल झाला. चोर पकडला गेला. देवालयाची संपत्ती सुरक्षित राहिली. चोरी करणे चांगले नाही, असे धर्मविचार समजावण्यासाठी अशा दैवी दिव्य संरक्षणाच्या घटना घडतात. धर्ममूल्यांवर विश्वास ठेवणे अतिशय आवश्यक आहे. धर्मविचार जिवंत राहिले पाहिजेत. धर्माचे संरक्षण व्हावे, अशी अनादी अनंत सत्तेची व्यवस्था आहे, असे सांगितले.
यावेळी अभिजीत दिलीप चौगुले, अक्षय दिलीप चौगुले, विजय सुबराव कदम, कागल यांच्यावतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी जीवन खोत शिवापूरवाडी, सुनीता पाटील, डॉ. वसुधा गुरव आडी, पुंडलिक बसरीकट्टी निपाणी, प्रफुल्ल शिंदे कागल, विशाल मंगवाने, दीपक मंगवाने निपाणी ,सागर नार्वेकर वज्रकांत सदगले निपाणी, जगन्नाथ मस्के सांगली, कृष्णा पाटील, कोगनोळी आदी मान्यवर भाविक व देणगीदारांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बेळगांव, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कर्नाटक, गोव्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.














