आता महिला चालवणार राज्याचा कारभार?

उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे रंगली चर्चा
Edited by:
Published on: December 01, 2022 12:43 PM
views 388  views

मुंबई : मुंबईत एका कार्यक्रमात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कार्यक्रमावेळी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामासाठी रणशिंग फुंकलं आहे. उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटाचे चिन्ह म्हणून अन्याय जाळणारी मशाल आम्हाला मिळाली आहे. ही अंधःकार दूर करणारी मशाल आपण तितक्याच ताकतीने वापरू, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

काल मुंबईत लहुजी वस्ताद साळे यांच्या 228 व्या जयंतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊ. शिवशक्ती भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. मी सध्या ते अनुभवतोय गद्दार आता मूठभरही राहिले नाहीत. पण निष्ठावान डोंगराएवढे आहेत. आपल्याला राज्यात पुन्हा सत्ता आणायची आहे. मुख्यमंत्रीपदी आपली व्यक्ती असेल. मग टी महिला असो किंवा पुरुष असंही ते बोलताना म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य खूप विचारपूर्वक केलं असणार यामुळे ठाकरेंच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण आहे? तो शिवसेनेचा आहे का? की बाहेरच्या पक्षाचा या चर्चांना आता उधाण आलं आहे. तसेच रश्मी ठाकरेंचंही नाव कायमच चर्चेत आहे. शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारेही आहेत. तर आघाडीचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचीही चर्चा आता रंगू लागली आहे.