
पुणे : मृत्युनंतर मालमत्तेवरून कुटूंबात वाद निर्माण होऊ नये अथवा किंवा तुमच्या मर्जीनुसार मालमत्तेची विल्हेवाट लावयाची असेल, तर त्यासाठी मुत्यूपत्र तयार करतात. परंतु ते कसे करावे, काय काळजी काय घ्यावी, या बाबत कायदा काय सांगतो, यांची कल्पना अनेकांना नसते. त्यामुळे मुत्यूपत्रावरून पुढे वाद निर्माण होतात.
हे सर्व टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन या संदर्भातील मार्गदर्शन करण्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग पुण्यात राबविण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या शंभर दिवसीय कार्यालयीन सुधारणा उपक्रमांमध्ये सह जिल्हा निबंधक वर्ग पुणे शहर कार्यालयाने विविध उपक्रम राबविले होते. साईराम या उपक्रमामध्ये ‘रिस्पेक्ट’ (आदर भाव) यातंर्गत ज्या ज्येष्ठ नागरिकांना ‘मृत्युपत्र’ या विषयावर मार्गदर्शन करण्याचे ठरविले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मोहम्मद वाडी येथील ‘सोनाश्रय वृद्धाश्रमा’स सह जिल्हानिबंधक यांनी भेट देऊन तेथे वास्तव्य करीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मृत्युपत्र विषयावर मार्गदर्शन केले. पुढील टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना या संदर्भात माहिती हवी असल्यास त्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याबबत माहिती देताना पुणे शहर सह जिल्हानिबंधक संतोष हिंगाणे म्हणाले,“ जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकास त्याचे मृत्युपत्र नोंदणी करावयाचे असेल आणि त्याकरिता त्याला दुय्यम निबंधक कार्यालयात तब्येतीचे कारणास्तव येणे शक्य होणार नसेल तर त्याकरिता गृहभेट हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्याकरिता संबंधितांनी त्यांचे जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वकील किंवा प्रतिनिधीमार्फत अर्जासहित संपर्क साधावा. अर्जाचा नमुना विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जासोबत मृत्युपत्र करणारी व्यक्ती आजारी असली तरी मृत्युपत्र करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.