मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही | शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी..?

Edited by:
Published on: April 07, 2024 06:23 AM
views 603  views

मुंबई : परभणी, उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन आपण युतीधर्म पाळला. पण आपला मित्रपक्ष युतीधर्म प्रामाणिकपणे पाळत नसल्याची तक्रार करतानाच ठाणे, नाशिक, रत्नागिरी – सिंधुदुर्ग, संभाजीनगर, पालघर हे मतदारसंघ मित्रपक्षांसाठी अजिबात सोडू नयेत, अशी आग्रही भूमिका शिवसेनेच्या मंत्री – आमदारांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने युतीधर्म पाळा, मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घ्या अशा सूचना शिंदे यांनी बैठकीत दिल्याचे समजते.

हक्काचे मतदारसंघ भाजपला द्यावे लागले, काही ठिकाणी भाजपच्या दबावामुळे ऐनवेळी उमेदवार बदलावे लागल्याच्या घटना ताज्या असतानाच ठाणे, नाशिकसह आणखी काही मतदारसंघावर मित्रपक्षांनी केलेल्या दाव्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली असून मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याचा आरोप शिवसेनेचे मंत्री, आमदार करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याचा आरोप करण्यात आला. आपण धाडस करून उठाव केला म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळे मिळाली. रायगड, शिरूर आपल्या हक्काचे मतदारसंघ मित्रपक्षाला देऊन आपण अपमान गिळून प्रचार सुरू केला आहे पण मित्रपक्षांकडून योग्य वागणूक मिळत नसून आता नाशिक, ठाणे,  रत्नगिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नयेत. यासाठी ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी या वेळी नेते आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर युतीच्या सरकारमध्ये तडजोडी कराव्या लागतात. युतीधर्म पाळावा लागतो. तुम्ही मित्रपक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जोमाने प्रचार करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.