सिंधुदुर्ग : निवडणुकीच्या काळात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना भेटल्याचा मोठा दावा भाजपचे निलेश राणे यांनी केला. आम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत असा इशाराही त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीनंतर निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला. निलेश राणे यांच्या या दाव्यानंतर आता कोकणात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निलेश राणे म्हणाले की, "किरण सामंत हे व्यावसायिक आहे. व्यावसायिकांवर मी का बोलावे? ते कुठल्या पदावर नाहीत. त्यांनी मागणी केली त्याला काही तरी बेस लागतो. निवडणुकीच्या काळात समन्वय का राखला नाही याचा अभ्यास सामंत यांनी करावा. या निवडणुकीत किरण सामंत हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेना भेटले. किरण सामंत उद्धव ठाकरे यांना निवडणुकीच्या काळात का भेटले हे माहीत नाही. शिंदे साहेबांना आम्ही या सर्व गोष्टी सांगणार आहोत. मी याचे पुरावे देणार आहे. सामंत जे वागले ते आम्ही विसरणार नाही."
आम्ही विजय मिळवला पण काही गोष्टी विसरणार नाही. राणेंना माफ करण्याची सवय नाही असा इशारा निलेश राणे यांनी दिला.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून काल मी मागणी केली. राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा आमच्याकडे यावेत अशी मागणी केली आहे. मागची काही वर्षे भाजपने ती निवडणूक साथीने लढवली. आता आम्हाला तो मतदारसंघ मिळावा. भाजपने मला कुडाळ मालवणची जबाबदारी दिली. पण काही लोकांनी कारण नसताना त्या जागेची मागणी केली. त्यांचा जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस यांनी मागणी केली होती. आम्ही त्या मतदासंघात 10 हजार मतांनी मागे आहोत.
उदय सामंत पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत. उदय सामंत या बाबत बोलतील ते का लीड देऊ शकले नाहीत. आम्ही रत्नागिरीमधून अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत.