मालवण : राज्यात ठाकरे गट आणि राणे यांच्यात घमासान सुरु आहे. त्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी खासदार निलेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे शिवजयंती निमित्त एकाचवेळी किल्ले सिंधुदुर्गवर येणार असल्याने वातावरण टाईट झाले होते. पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसमवेत शिवराजेश्वर मंदिरात जाऊन पूजा करत माघारी फिरल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आज शिवजयंती निमित्त ठाकरे गटाकडून आणि भाजपाकडून किल्ले सिंधुदुर्ग शिवजयंती साजरी करण्यात येणार आली. दोन्ही पक्षांनी यापूर्वी आपले शिवजयंतीचे कार्यक्रम जाहीर केले होते. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि भाजपाचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे हे कार्यक्रमाला उपास्थित राहणार होते. राज्यात ठाकरे गट आणि राणे वार वैर शर्वश्रुत आहे. त्यात निलेश राणे, वैभव नाईक एकाच मंदिरात आमने सामने येणार असल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली होती. बंदर जेटीसह किल्ले सिंधुदुर्गवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आमदार वैभव नाईक किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात उपस्थित असतानाच भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांची ढोल ताशांच्या गजरात शिवराजेश्वर मंदिरात एंट्री झाली. मात्र, निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसमवेत शिवराजेश्वर मंदिरात जाऊन पूजन केले. मंदिरात पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर निलेश राणे माघारी परतले. मात्र, दोन्ही नेते एकाच वेळी येणार असल्याने पोलिसांची दमछाक झाली होती.