निलेश जोशी यांना आकाशवाणीचा 'बेस्ट परफॉर्मन्स' पुरस्कार !

गुजरात येथील कार्यशाळेत डॉ. वसुधा गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 18, 2024 13:46 PM
views 208  views

कुडाळ : गुजरात-केवाडिया येथे झालेल्या आकाशवाणीच्या पश्चिम विभागीय आकाशवाणी वार्ताहर कार्यशाळेत महाराष्ट्रातून आकाशवाणीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी निलेश अशोक जोशी यांना बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    गुजरात, महाराष्ट्र ,गोवा ही राज्ये आणि  दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशातील वार्ताहरांची कार्यशाळा केवाडिया-गुजरात येथे आयोजित करण्यात आली होती.  त्यामध्ये आकाशवाणीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल डॉ.  वसुधा गुप्ता यांच्या हस्ते हा पुरस्कार निलेश जोशी यांना प्रदान करण्यात आला.  या कार्यशाळेसाठी गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दीव दमण येथून सुमारे ६० वार्ताहर सहभागी झाले होते.  यामधून या  राज्यातील चार वार्ताहरांची  बेस्ट परफॉर्मन्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.  यामध्ये महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी आणि पालघर जिल्ह्याच्या वार्ताहर नीतू चौरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  गुजरात राज्यातून एक आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातून एक असे इतर दोन पुरस्कार देण्यात आले.

विविध प्रकारच्या विकासात्मक बातम्या, लाभार्थी बाईट, ह्यूमन इंटरेस्ट सॉफ्ट स्टोरीज, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामढील स्पेशल स्टोरीज,  विकसित भारत संकल्प अभियान तसेच आकाशवाणीच्या वृत्त विषयक विविध कार्यक्रमात असलेला सहभाग यांचे मूल्यमापन करून हा पुरस्कार देण्यात येतो.

या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी आकाशवाणी मुंबई वृत्त विभागाच्या डायरेक्टर जनरल सरस्वती कुवळेकर, आकाशवाणी अहमदाबाद केंद्राचे वरिष्ठ अधिकारी, आकाशवाणी पणजी केंद्राचे अधिकारी, तसेच गुजरात महाराष्ट्र, गोवा, दीव दमण येथील आकाशवाणीचे विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.