राष्ट्रवादी अजित पवारांची !

Edited by: ब्युरो
Published on: February 15, 2024 12:44 PM
views 114  views

मुंबई : राष्ट्रवादीतील फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी कुणाची हे ठरविताना विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष असल्याचं सांगत अजित पवार गटाला ५३ पैकी ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याने अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचवेळी अजित पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची शरद पवार गटाची मागणीही नार्वेकर यांनी फेटाळून लावली. त्यामुळे अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरले आहेत. पक्षघटना, नेतृत्वरचना आणि विधिमंडळ संख्याबळ लक्षात घेऊन निर्णय दिल्याचंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी फूट पडली होती. अजित पवार आणि त्यांचे समर्थक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबतच्या आमदारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या.