सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेचा उडालेला बोजवारा कोकणसादनं पुढं आणला होता. यानंतर आमदार, खासदार, शालेय शिक्षणमंत्री ते विधानसभा अध्यक्ष या कोकणच्या सुपुत्रांनी त्याची दखल घेतली होती. कोकणच्या विकासात मोठं योगदान देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देखील याबाबत विचारलं असता त्यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमकुवत नाही. काही उणीव असेल तर ती मी भरून काढीन. गोरगरीब रूग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये आल्यास त्याला दाखल करून घेत मोफत सेवा देऊ अस नारायण राणे म्हणालेत. पडवे येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयात असलेल्या रिक्त पदांबाबत तसेच जिल्ह्यातील रूग्णांना गोवा बांबोळी येथे उपचारासाठी पाठविण्यात येत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारलं असता ते म्हणाले, आमचं देखील वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमकुवत नाही. शासकीय रूग्णालयात उपचार झाले नाही तर ते आम्ही करू. गरीब असल्यास पैसे घेतले जाणार नाहीत. अनेक ठिकाणी आम्ही तसं करतो. तर शासकीय आरोग्य यंत्रणा कमकुवत अजिबात नाही काही उणीव असेल तर ती मी भरून काढीन. कोरोनातील दोन वर्षे आमच्या लाईफ टाईम हॉस्पिटलनं एकही रूपया न घेता सेवा दिली होती. त्याच कौतुक किंवा आभार कुणी मानले नाहीत. पण, आरोग्य क्षेत्रातील उणीव भरून काढली जाणार, आजही जिल्ह्यातील कुणीही गोरगरीब रुग्ण आला तर त्यांना दाखल करून घेत आमच्या हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा देऊ अस मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं.