नागपूर : नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे आज बुधवारी सूप वाजले. आगामी विधिमंडळ अधिवेशन 26 फेब्रुवारीला होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष अॅड. नार्वेकर यांनी 26 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन राहणार असून शिंदे सरकारचे हे शेवटचे अधिवेशन राहील. दरम्यान, या हिवाळी अधिवेशनात एकूण बैठका 10 झाल्या असून यामध्ये प्रत्यक्ष कामकाज 101 तास 10 मिनिटांचे झाले आहे. रोजचे सरासरी कामकाज 10 तास 5 मिनिटे झाले. या अधिवेशनात वेळ वाया गेलेला नाही. या अधिवेशनादरम्यान एकूण 7,581 तारांकित प्रश्न विचारण्यात आले होते. यांपैकी स्वीकृत प्रश्न 247 होते. तर उत्तर देण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या 34 होती. अल्पकालिन चर्चा 3 प्राप्त झाल्या होत्या. त्यातील दोन मान्य झाल्या होत्या. अशासकीय ठराव एकूण 263 प्राप्त झाले होते. त्यापैकी 187 मान्य झाले. पण एकाही ठरावावर चर्चा झाली नाही. एकूण लक्षवेधी सूचना 2414 प्राप्त झाल्या होत्या. स्वीकृत सूचना 337 होत्या. 70 लक्षवेधीवर चर्चा झाल्या. दरम्यान, सदस्यांची उपस्थिती 93.33 टक्के तर कमीत कमी उपस्थिती 64.73 टक्के एकूण सरासरी उपस्थिती 81.69 टक्के नोंदविली गेली. विधानसभेचे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 26 फेब्रुवारी 2024 रोजी विधानभवन मुंबई येथे होणार आहे.