दोडामार्ग : एमएनजीएल कंपनीच्या मुजोरागिरीबाबत कोकणसादने अधोरेखित केलेलं वृत्त तंतोतंत खरे ठरले. पाईप लाईनसाठी खोदलेल्या चरात माटणे येथे खोदलेल्या चरात दोन जनावरे पडून त्यात एकाचा बळी गेल्याचं वृत्त हाती आलं आहे. दुसऱ्या जनावराला वेळीच बाहेर न काढल्यास त्याचीही जीव जाण्याची शक्यता आहे. रविवारी काम बंद असल्याने त्या चरात पडलेल्या गायींना काढणार कोण, असा सवाल विवेक एकावडे व ग्रामस्थांनी उपस्थित केला आह. दोडामार्ग ते बांदा-आयी पर्यंत राज्यमार्गावर एमएनजीएल कंपनीच्या गॅस पाईपलाईनचे गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे. पावसाळ्यात बंद असलेलं हे काम पाऊस ओसारताच पुन्हा एकदा ठेकेदारांनी सुरू केलेले आहे. या मार्गावर सहा हुन अधिक ठेकेदार काम करत असून काम पूर्ण करण्यासाठी या ठेकेदारांतच चुरस आहे. त्यामुळे जेवढ्या फास्ट काम उरकता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. शासनाने दिलेल्या अटी शर्थी यांना पायदळी तुडवून कंपनीचे हे ठेकेदार दोडामार्ग बांदा व आयी माटणे राज्यमार्गावर साईडपट्टी पोखरण्याचं काम करत आहेत. काही ठिकाणी जर जागा मिळाली नाही तर थेट रस्ता पोखरून सुद्धा पाईपलाईन टाकली जात आहे. सुमारे सहा फूट जमिनीखाली ही पाईपलाईन टाकली जात असल्याने खोलवर खोदलेल्या चारातील माती सुद्धा जागा मिळेल तिथं टाकून आपलं काम उरकून घेत आहेत.
अशाच खोदलेल्या चरात अखेर शनिवारी रात्री माटणे येथे दोन गायी पडल्या असून त्यात एका गायीन जीव गमावल्याची माहिती विवेक एकावडे यांनी दिलीय. कंपनी ठेकेदारांच्या या मुजोरागिरीने जनावरांना जीव गमवावा लागला आहे. मात्र यात काळजी न घेतल्यास रात्री अपरात्री रहदारी करणाऱ्या नागरिकांना सुद्धा धोका असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं असून प्रशासनाने या मुजोर ठेकेदारांना वेळीच आवर घालण्याची मागणी होत आहे.