
मुंबई : कोकणातील विजेच्या गंभीर प्रश्नाबाबत आमदार निलेश राणे यांनी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवीला होता. कोकणातील या प्रश्नासाठी खास बैठक अधिवेशन काळात लावण्यात यावी अशी आग्रही मागणी देखील निलेश राणे यांनी केली होती. या गंभीर प्रश्नांची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत वीज वितरणच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा होऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
चालू पावसाळी अधिवेशनात कोकणातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी आज कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत विविध तांत्रिक अडचणी, खंडित वीजपुरवठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली असून योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार महेंद्र दळवी, शेखर निकम, प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, ऊर्जा विभागाचे सचिव लोकेशचंद्र तसेच ऊर्जा विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.