सावंतवाडी : सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभेसाठी भाजप सेनेत शीतयुद्ध सुरू असून खासदारकीसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नावाची चर्चा देखील होत आहे. याबाबत मंत्री केसरकर यांना विचारलं असता लोकसभेबाबत अद्याप विचार केलेला नाही. मात्र, वरिष्ठांना नाही म्हणू शकत नाही. खासदारकीला अनेक चेहरे महायुतीत आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचा जो उमेदवार असेल त्यासाठी मतदारसंघ पिंजून काढून युतीचा उमेदवार विजयी करणार असल्याचा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, खासदारकीला माझ्या नावाची चर्चा होणं, त्या पदासाठी मला बहुमान देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी स्वतःच्या मतदारसंघात खूश आहे. वर्षभरात सर्व प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी भर देत आहे. ती मार्गीही लागली आहेत. काम पुर्ण करण्याचा धडाका लावला असून ज्या लोकांनी प्रेम केलं त्यांना न्याय द्यावा लागतो. तो न्याय निश्चित दिला जाईल. तर लोकसभा निवडणूकीबाबत मी काहीच विचार केलेला नाही. शेवटी हा वरिष्ठांचा निर्णय असतो. वरिष्ठांना नाही म्हणू शकत नाही. परंतु, अनेक चांगले उमेदवार महायुतीत आहेत. रविंद्र चव्हाण, किरण सामंत यांसारखे चांगले उमेदवार मतदारसंघात आहेत. त्यामुळे युतीचा कुणीही चांगला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी संपूर्ण रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ पिंजून काढणार आहे. सोमवारी रत्न-सिंधूची बैठक आहे. जनतेच कल्याण करण्यासाठी आमचा भर आहे. निधीही वाढवून मिळाला आहे. शेतकरी, महिला, मच्छिमार, पर्यटनाच्या विविध योजना राबवायच्या आहेत. लोकांची मने आम्ही याआधी जिंकलेली आहेत ती यातून अधिक जिंकू असं मत व्यक्त केले.
दरम्यान, सेना-भाजपातील शीतयुद्धाबद्दल विचारल असता, आमची युती एकदम घट्ट आहे. मागच्या वेळी पालघरमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले होते त्यांना परत शिवसेनेच चिन्ह दिलं. युतीत काही गोष्टी चालतात. त्यात आम्ही दोन वेगळे पक्ष नसुन एक आहोत. युती म्हणून आम्ही लढणार आणि युती म्हणूनच जिंकणार असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.