
सावंतवाडी : गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या घरांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील राणीबाग ते विधानभवन असा भव्य लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार आणि त्यांचे वारस मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष शाम कुंभार यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष शाम कुंभार यांच्या उपस्थितीत आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट कार्यालयात झालेल्या बैठकीत, या लॉंग मार्चमध्ये कामगार आणि वारसांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या कामगार व वारसांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची खात्री दिली. या बैठकीला लॉरेन्स डिसोझा, रामचंद्र कोठावळे, सुभाष परब, विश्वनाथ कुबल, अभिमन्यू लोंढे, अशोक दळवी, रेखा लोंढे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शाम कुंभार आणि लॉरेन्स डिसोझा यांनी सांगितले की, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या उपस्थितीत १४ कामगार संघटना घरांच्या प्रश्नावर एकत्रित आल्या आहेत. अनेक मागण्या मध्ये शेलू आणि वांगणी येथील घरांना विरोध करत मुंबईमध्येच घरे मिळावीत, अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. गिरणी कामगार, त्यांचे वारस आणि त्यांचे नातेवाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे मान्यवर पदाधिकारी देखील या लॉंग मार्चला उपस्थित राहणार असल्याने, घरांच्या प्रश्नावर सरकारला घेरल्यास न्याय मिळू शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला. म्हाडाकडे लॉटरीत फॉर्म भरूनही लॉटरी जाहीर न झाल्याने सरकारला जागे करूया, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी श्रीधर नाईक, प्रकाश मांजरेकर, निलेश महाजन, अमित गोडकर, शिवराम राऊळ, प्रसाद गावडे, राजेश देसाई, प्रकाश गवस, परशुराम महाडेश्वर, अजय नाईक, राजाराम खानोलकर, प्रसाद धुरी, सुरेश बिर्जे, मदन नारोजी, बाळकृष्ण नाईक, रवींद्र पेडणेकर, अनंत राऊत, दशरथ नाईक, तुळशीदास एकावडे, मोहन सावंत, तुषार सावंत, राजन नाईक, अमित नाईक, प्रज्योत सावंत यांच्यासह अनेक कामगार आणि वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते.