रायगडमध्ये दरड कोसळून अनेक जण बेपत्ता | ५ जणांचा मृत्यू | NDRF ची बचाव पथकं घटनास्थळी

Edited by:
Published on: July 20, 2023 09:34 AM
views 323  views

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफची दोन पथकं बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. या बचाव पथकांचं शोधकार्य सुरू आहे. तसेच मुंबईहून आणि पनवेलहूनही तीन बचाव पथकं इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे घटनेची पाहणी करण्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. दरम्यान, बचाव पथकांनी आतापर्यंत २२ जणांची सुखरूप सुटका केली आहे. अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे १०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी बचाव कार्यात गुंतले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. यासह बचावकार्यात एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.