ब्युरो न्यूज : बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईत २० जानेवारीला आमरण उपोषण करणार असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. मराठ्यांवर दबाव टाकणं सोप्पं नाही, असा इशाराही जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.
जरांगे-पाटील म्हणाले, सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत १८ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू केलं. त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील. शांततेच्या आणि कायदेशीर मार्गानं आपण उपोषण करू. पण, कोण कुठं बसेल माहिती नाही. रोड मोकळी करून बसण्याची व्यवस्था करावी. नाहीतर आमच्या धोरणाने आम्ही बसू. मात्र, मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली, तर विराट समुदाय माघारी फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरू असा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. फक्त शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे चला. शांततेची धूळ जरी उडाली, तरी सरकार मुंबईत राहणार नाही. सगळे आपल्या गावी येणार असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.