“येवल्याचं येडपट...जरांगेंची एकेरी भाषेतून टीका !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 23, 2023 18:08 PM
views 342  views

बीड : मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लावून धरण्यात आली आहे. यासाठी राज्यभरात ते मराठा समाजाला एकत्रित करून भव्य अशा सभा घेत आहेत. 24 डिसेंबरला मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठीची वेळ संपणार आहे.

त्यामुळे सरकारच्या हातात केवळ 24 तास शिल्लक राहिले आहेत. पण मराठा समाजाला न्यायालयासमोर टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्यायचे आहे, त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला आणखी काही वेळ देण्यात, असे सरकारच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा एक दिवस शिल्लक असल्याने आज बीड शहरात मनोज जरांगे यांची इशारा सभा पार पडली. या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहिलेला पाहायला मिळाला. या सभेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीलाच ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.


बीडमधील सभेतून मनोज जरांगे पाटील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेतून टीका केली. येवल्याचा येडपट… बुजगावण… या शब्दांत मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. मनोज जरांगे म्हणाले की, शांत असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला गेला. कोणी म्हणत घरे जाळली, कोणी म्हणत हॉटेल जाळले. पण हे मराठ्यांनी केले नाही. जर मराठ्यांना काही करायचे असते तर त्यांनी आज नसते का केले. काही न करता पोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे.