मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह बांधकामातील त्रुटी होणार दुर

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संबंधित अधिका-यांना सुचना
Edited by: गुरुप्रसाद दळवी
Published on: October 03, 2022 20:21 PM
views 337  views

कुडाळ : मालवणी नटसम्राट कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना कळविताच त्यांनी तात्काळ याची दखल घेतली. नाट्यगृहाचे काम योग्य पद्धतीनेच करण्यात यावे, अशा सूचना देत अधिका-यांची आमच्या सोबत बैठक आयोजित केली, तसेच आराखडा योग्य पध्दतीने करण्यात आला. त्यामुळे नाट्यगृहाचे काम योग्य पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तेंडुलकर व बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह तसेच नाट्य दिग्दर्शक केदार सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेर्से, भाजपाचे गटनेते विलास कुडाळकर, जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, बंड्या सावंत, माजी नगरसेविका उषा आठल्ये, नगरसेवक राजीव कुडाळकर, तालुका कोषाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, चंदन कांबळी, राजवीर पाटील, मंदार पडवळ आदी उपस्थित होते.

यावेळी निलेश तेंडुलकर यांनी सांगितले की, कुडाळ येथील नाट्यगृहाचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने होत असल्याने नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी याबद्दल आक्षेप घेतला होता. त्यामुळे बांधकाम योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी राज्याचे बांधकाम मंत्री चव्हाण यांना कळविताच त्यांनी या बाबत तात्काळ कार्यवाही सुरू केली. मी, केदार सामंत, उप अभियंता राजन चव्हाण, शाखा अभियंता यादव यांनी मुंबईत जाऊन मुख्य आर्किटेक्ट देशपांडे यांची भेट घेतली. त्यांनी ताबडतोब डिझाईन बदलण्याबाबत व केदार सामंत यांच्या सूचनेनुसार रंगमंच जसा हवा त्याप्रमाणे आराखडा बनवण्याबाबत संबंधितांना सांगितले. ते काम करून घेतले. सामंत तसेच याचे इंजिनियर यांच्या समवेत मुंबई येथे भेट घेतली व याबद्दल त्यांना माहिती देऊन सदरचे काम योग्य पद्धतीने व्हावे, अशी मागणी केली. आठ दिवसांनी या बाबत अजुन एक बैठक होणार आहे.

यावेळी केदार सामंत यांनी सांगितले की, कुडाळला गेल्या शंभर वर्षाचा सांस्कृतिक चळवळीचा वारसा आहे. हा वारसा रंगभूषाकार कै. बाबा वर्दम, चि. त्र्य. खानोलकर, वसंत दळवी, शांताराम साळवी तसेच इतर विविध क्षेत्रातील दिग्गज नाट्य कलाकारांनी सुरू केला. ही नाट्यचळवळ आतापर्यंत सर्व पुढच्या पिढीने सुरू ठेवली. कुडाळमध्ये बाबा वर्दम थिएटर्स, दत्तराज मित्र मंडळ, रंग बहार, श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ, साई कला मंच, सिद्धांत थिएटर्स, निर्मिती थिएटर्स अशा अनेक नाट्यसंस्थानीही ही नाट्य परंपरा सुरू ठेवली. मात्र कुडाळात बंदिस्त असे थिएटर्स नव्हते. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी नाट्यगृहाची संकल्पना आणली व सिंधुदुर्गसाठी सुमारे 8 कोटी निधी तरतुदीचे ओरोस येथे कै. मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने नाट्यगृह मंजूर केले. सदरच्या नाट्यगृहाचे ओरोसमध्ये न होता आता कुडाळमध्ये बांधकाम सुरू आहे. मात्र बांधकामाची पाहणी केली असता, या ठिकाणी बांधकामात अनेक त्रुटी आहेत, रंगमंचाची रुंदी खूप कमी आहे. त्यामुळे व्यावसायिकच नाहीतर हौशी नाटकाचे नेपथ्य लागणार नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणतेच नाटक होऊ शकत नाही. त्यामुळे खर्च करून उपयोग काय? त्यामुळे या नाट्यगृहाचे बांधकाम योग्य पध्दतीने व्हावे या करीता अनेक वेळा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले होते.

आता भाजपाचे निलेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्रुटीबाबत आम्ही त्यांच्याकडे नाट्यकर्मी म्हणून सर्व माहिती दिली. यावेळी आम्हाला चव्हाण यांनी संबंधित अधिका-यांसोबत मुंबई येथे बैठक आयोजित करून दिली. योग्य पद्धतीने बांधकाम तसेच रंगमंचाची रूंदी, अंतर्गत रचना, यंत्रणा याबाबतही योग्य पद्धतीने कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. या नंतर तशी कार्यवाही सुरू झाली असुन तसा आराखडा ही करण्यात आला. त्यामुळे आता निश्चितच मालवणी नटसम्राट कै मंच्छीद्र कांबळी नाट्यगृहाचे बांधकाम योग्य पद्धतीने होईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.


नाटयगृह बांधकामासाठी अ,ब,क वर्गवारी नको 

शासनाची नाट्यगृहेही अ, ब, क अशा वर्गवारीमध्ये केली जातात. मात्र नाटक सादरीकरणात कधीही अ, ब, क असे वर्ग नसतात. त्यामुळे नाट्यगृहाची अ, ब, क वर्गाची संकल्पना मोडीत काढावी. एखाद्या नव्याने बांधण्यात येणा-या नाट्यगृहाची बैठक व्यवस्था कमी केली तरी चालेल, मात्र मूलभूत गरजा, रंगमंच, यंत्रणा यामध्ये या गोष्टी कमी करू नयेत, अशी ही मागणी चव्हाण यांचेकडे केल्याचेही केदार सामंत यांनी सांगितले.